सोलापूर , 16 ऑक्टोबर (हिं.स.) : शेती विकून आलेल्या पैशातून एका महिलेने तब्बल २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विठूरायाच्या चरणी दान केले. या भक्त महिलेच्या दानशूरपणाची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.
धाराशीव जिल्ह्यातील महिलेने पंढरपुरात श्रीविठ्ठल मंदिरात २५.५ तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा दान केला. तर रुक्मिणी मातेला जवळपास दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले. याची एकत्रित किंमत १८ लाख रुपयांच्या घरात जाते.विठूरायापासून तुळजाभवानी, अंबाबाईपर्यंत आणि लालबागचा राजापासून सिद्धिविनायकापर्यंत लाडक्या देवाच्या चरणी दानधर्म करणाऱ्या भक्तांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. फक्त राज्यातूनच नव्हे, तर देश-परदेशातून मोठमोठ्या दानाचा ओघ महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना होताना दिसतो. पंढरपुरातील सावळ्या विठ्ठलाच्या चरणीही एका आजीबाईंनी दान दिलं आहे. विशेष म्हणजे शेती विकून त्यांनी जणू आपलं सर्वस्वच देवाचरणी अर्पण केलं आहे.
हिंदुस्थान समाचार
