अहमदनगर, 17 ऑक्टोबर, (हिं.स.) : अहमदनगर शहरात होणाऱ्या सभेच्या अनुषंगाने प्रोफेसर चौकात लावण्यात आलेले होर्डिंग काढताना छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे छायाचित्र असलेल्या बॅनरचा अवमान करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई होण्यासाठी शिवसेना,भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या शिष्टमंडळाने तोफखाना पोलीस स्टेशनला ठाण मांडले होते.शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून महापालिकेचे कर्मचारी सागर जपकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्याशी सदर प्रकरणी चर्चा करुन भावना दुखावल्या म्हणून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मागील आठवड्यात प्रोफेसर चौकात लावण्यात आलेले सभेचे होर्डिंग मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने काढण्यात आले.त्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे फोटो व मजकूरचा समावेश होता.सदर फलक काढताना कर्मचाऱ्यांनी महाराजांचे राज्याभिषेकाच्या फोटोचा अवमान केला.त्याचे व्हिडिओ देखील युवकांनी काढले.त्या व्हिडिओद्वारे तोफखाना पोलीस स्टेशन येथे कुणाल भंडारी यांच्या फिर्यादीवरून शिवप्रेमीं च्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी महापालिकेचे कर्मचारी सागर जपकर यांच्या वरगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
