रायगड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।
हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारे गडकिल्ले म्हणजे आपल्या पराक्रमी पूर्वजांचा अभिमान! या वारशाचे संवर्धन आणि नवीन पिढीत इतिहासाबद्दल आदरभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने चेंढरे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच सौ. प्रणिता प्रल्हाद म्हात्रे यांनी दिवाळीनिमित्त किल्ला बनवण्याची खुली स्पर्धा आयोजित केली होती.
या उपक्रमाला गावातील लहानथोर नागरिक, महिला व तरुण मित्रमंडळींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चेंढरे हद्दीतील विविध परिसरातून साठहून अधिक स्पर्धकांनी ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सुंदर miniature प्रतिकृती तयार करून सहभाग नोंदवला. आज या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सौ. प्रणिता म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. यशोमती पाटील व विद्यानगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, आयोजकांनी प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जाऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन गौरव केला.
या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये ऐतिहासिक जाणीव जागृत झाली असून, पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्याचे आश्वासन मुलं व युवकांनी दिले.
विजेते पुढीलप्रमाणे :
१) श्री. प्रभाकर माळवदे
२) श्री. अमोल सर
३) श्री. सीगल सोसायटी
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी परस्परांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदमय वातावरणात सोहळ्याची सांगता केली. सर्व स्पर्धक, ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांचे सौ. प्रणिता प्रल्हाद म्हात्रे आणि श्री. प्रल्हाद म्हात्रे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
—————
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके
