रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं.स.) : रत्नागिरीत सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भविष्यात पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, अशी अपेक्षा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
रत्नागिरीच्या पहिल्या शासकीय महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाले आहे. महाविद्यालयाची प्रवेशक्षमता १०० असून त्यामध्ये केंद्रीय प्रवेशप्रक्रियेनुसार तेवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यापैकी ८५ विद्यार्थी राज्यातील, तर १५ विद्यार्थी राज्याबाहेरील आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये रत्नागिरीतील ४ तर सिंधुदुर्गातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. या सर्व १०० विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ श्री. सामंत यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रमामध्ये मुंबईप्रमाणेच रत्नागिरीच्या महाविद्यालयाचाही क्रम द्यावा. त्यासाठी महाविद्यालयाचा लौकिक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनीही वाढवावा. या महाविद्यालयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पूर्णपणे वातानुकूलित असलेले राज्यातील हे पहिले वैद्यकीय महाविद्यालय असल्याचे सांगून श्री. सामंत म्हणाले की, जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर रुग्णालयांना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची उणीव सातत्याने भासत होती. ती या महाविद्यालयामुळे दूर होऊ शकेल. तीन वर्षांनंतर याच महाविद्यालयात पदव्युत्तर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमही सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने त्याचा पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात प्रथम या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीसाठी हालचाली सुरू झाल्या. तेथेही केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमुळे सर्व परवानग्या अल्पवेळातच मिळाल्या आणि हे महाविद्यालय मार्गी लागले, असे श्री. सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीत अनेक विकासकामे होत आहेत. दीर्घकालीन उपयोग होईल, असे शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कौशल्य विकास महाविद्यालय, देशातील पहिली आर्किटेक्चर फर्म, मुंबईनंतर राज्यातील पहिले शासकीय विधी महाविद्यालय अशा विविध क्षेत्रातून रत्नागिरी प्रगतिपथावर आहे. लंडनहून आणलेली शिवरायांची वाघनखे तीन वर्षे भारतात राहतील, असा करार करण्यात आला आहे. तीन वर्षांत ती कोठे कोठे ठेवली जातील, ते निश्चित करण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जगातील पहिले अभ्यासकेंद्र रत्नागिरीमध्ये होणार असल्याने तेथे ही वाघनखे काही काळासाठी असावीत, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली असून ती त्यांनी मंजूरही केली आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. रामानंद यांनी प्रास्तविकात महाविद्यालयाविषयीची माहिती दिली. ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अलिमियाँ परकार, नवनिर्माण महाविद्यालयाचे प्रमुख अभिजित हेगशेट्ये यांनी शुभेच्छा दिल्या. समारंभात डॉ. अमोल पटवर्धन, डॉ. नितीन चव्हाण, पत्रकार अरविंद कोकजे, उद्योजक अण्णा सामंत, भैरी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री. सुर्वे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
