* निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नये, शरद पवार गटाची मागणी * सोमवारी (९ ऑक्टोबर) पुन्हा सुनावणी
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर (हिं.स.) : शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर झालेली निवड आणि त्यांच्या अध्यक्षपदाला मान्यता दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार गटाने केला. शरद पवार हे आपल्या मर्जीप्रमाणे पक्षाचा कारभार करत असल्याचा आरोपही अजित पवार गटाने केला आहे. दरम्यान जोपर्यंत चिन्हावर निर्णय होत नाही तोपर्यंत ते आम्हाला द्यावं आणि गोठवू नये, अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाची लढाई निव़डणूक या संदर्भात आयोगासमोर आज पहिली सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी, तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंनी आज जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या सुनावणीच्या वेळी स्वतः शरद पवारांनी उपस्थिती लावली. अजून शरद पवार गटाचा युक्तिवाद शिल्लक आहे. त्यासाठी येत्या सोमवारी ९ ऑक्टोबरला ४ वाजता निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी होणार आहे.
सुनावणी दरम्यान अजित पवार गटाने सर्वांत आधी जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला. शिवाय सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा आम्हाला आहे, त्यामुळे आम्हीच खरा पक्ष आहोत. अजित पवार गटाने आमदारांच्या संख्येचा दाखला देताना नागालँडमधील आमदारांची संख्याही दाखवली. आमच्याकडे ५५ आमदार आणि दोन खासदार आहेत.
हिंदुस्थान समाचार
