– रहिवाशांच्या तक्रारीनंतर बीएमसीचा डेसिबल स्टडीचा निर्णय
मुंबई, 09 मार्च (हिं.स.)। मुंबईतील कोस्टल रोडवरील ‘मेलडी रोड’ हा सुरुवातीला नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे चर्चेत आला होता. मात्र परिसरातील रहिवाशांनी ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी केल्यानंतर आता महापालिकेने या रस्त्यावरील आवाजाची पातळी तपासण्याचा निर्णय घेतला आहे. ध्वनी पातळी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी डेसिबल स्टडी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या महिन्यात 11 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या कोस्टल रोडवर विशेष संगीतमय रस्ता सुरू करण्यात आला होता. या रस्त्यावरून वाहनं ठराविक वेगाने गेल्यास जगप्रसिद्ध ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू येते. या गाण्याचे संगीतकार ए.आर. रहमान असून हे गाणे ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटामुळे जागतिक स्तरावर लोकप्रिय झाले आहे. या संकल्पनेत हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून रस्त्यावर खास प्रकारच्या संगीतमय पट्ट्या बसविण्यात आल्या आहेत. वाहनांच्या चाकांचा या पट्ट्यांशी होणारा घर्षणामुळे विशिष्ट स्वर तयार होतात आणि त्यामुळे गाडीतील प्रवाशांना गाण्याची धून ऐकू येते.
मरीन ड्राइव्ह बोगद्यातून बाहेर पडल्यावर अमरसन्स गार्डन ते ब्रीच कँडी दरम्यान सुमारे 700 मीटर अंतरावर हा म्युझिकल रोड तयार करण्यात आला आहे. वाहनं 70 ते 80 किलोमीटर प्रतितास वेगाने गेल्यास ‘जय हो’ या गाण्याची धून स्पष्ट ऐकू येते. सुरुवातीला या कल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी खास या अनुभवासाठी कोस्टल रोडवरून प्रवास केला.
मात्र ब्रीच कँडी परिसरातील रहिवाशांनी या रस्त्यामुळे सतत आवाज निर्माण होत असल्याची तक्रार केली आहे. सुमारे 650 पेक्षा जास्त कुटुंबांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे. वाहनं रस्त्यावरून गेल्यानंतर निर्माण होणारा आवाज घरांपर्यंत पोहोचत असल्याने खिडक्या उघड्या ठेवणे कठीण होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच या संकल्पनेचा स्थानिक नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने या रस्त्यावरील ध्वनी पातळीचे तांत्रिक मूल्यमापन करण्याचे आदेश दिले आहेत. साऊंड लेव्हल मीटरसारख्या उपकरणांच्या सहाय्याने डेसिबलमध्ये आवाजाची मोजणी केली जाईल आणि तो पर्यावरणीय ध्वनी मानकांच्या मर्यादेत आहे की नाही, याचा अभ्यास केला जाईल. या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार आवश्यक असल्यास सुधारणा किंवा अन्य उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
————–
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
