पुणे 4 डिसेंबर (हिं.स) :मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने नोव्हेंबरमध्ये उत्पन्नात मोठी वाढ नोंदवली आहे. रेल्वेने केवळ प्रवासी वाहतुकीतून सुमारे शंभर कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. दिवाळीच्या काळात वाढलेल्या प्रवासी संख्येचा रेल्वेला फायदा झाला आहे. मागील महिन्यात पुणे विभागाला एकूण १४३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
रेल्वेच्या पुणे विभागाने नोव्हेंबर महिन्यात प्रवाशांच्या वाहतुकीतून ९९ कोटी ७६ लाख रुपयांचा महसूल मिळवला. तो मासिक उद्दिष्टापेक्षा ५.५ टक्के जास्त असून, मागील वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत ९.९ टक्के अधिक आहे. तिकीट तपासणीतून रेल्वेने ३ कोटी ९ लाख रुपयांचा महसूल मिळविला. मासिक उद्दिष्टापेक्षा तो २८.८ टक्के जास्त असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ५७.७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
