पुणे 17 ऑक्टोबर (हिं.स) शहर आणि परिसरातील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वर नोंदला जात असून, अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत आहे. पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात मुख्यतः निरभ्र वातावरण कायम राहणार आहे, असे हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे. त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कायम राहणार आहे.
शहरात ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा २.३ अंशांनी वाढ कायम आहे. किमान तापमान २०.९ अंशांवर पोहोचले आहे. यंदा मॉन्सूनची कामगिरी सरासरी इतकी होती. त्यात वेळेआधीच पुण्यासह जवळपास संपूर्ण राज्याचा निरोप घेतल्याने कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उष्ण वातावरणाच्या प्रभावामुळे अंगाची लाही लाही होत आहे. ही स्थिती तूर्तास अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार
