
चंद्रपूर 4 ऑक्टोबर (हिं.स.) – आंध्र प्रदेशातील पिठापूर येथील प्रसिद्ध दत्तक्षेत्र श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानातील पादुका, पालखी व रथयात्रेचे महाराष्ट्र आगमन झाले आहे. दरम्यान सदर पादुका रथयात्रा रविवार ८ ऑक्टोबर रोजी चंद्रपुरातील स्थानिक विठ्ठल मंदिर वार्डातील श्री त्रिंबक स्वामी देवस्थानात येणार आहे.
पिठापुरातील श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानातील श्रीपाद पादुका रथयात्रा महाराष्ट्रात ४ ऑक्टोबर रोजी रात्री परळी वैजनाथ येथे आली आहे. तेथून ही यात्रा हिंगोली, वाशिम, यवतमाळ असा प्रवास करून चंद्रपूर येथे ८ ऑक्टोबर रोजी चंद्रपुरातील स्थानिक विठ्ठल मंदिर वार्डातील श्री त्रिंबक स्वामी देवस्थानात पोहचणार आहे. तेथे मुक्कामी असून दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ८ नगर प्रदक्षिणा करणार आहे. आयोजक व भाविकांतर्फे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती श्री त्रिंबक स्वामी देवस्थानाचे वहिवाटदार किशोर डेहणकर यांनी दिली. नियोजित कार्यक्रम स्थळी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. त्यानंतर ही यात्रा वर्धेकडे प्रयाण करेल. पिठापूरच्या श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाने महाराष्ट्रातील भक्तांच्या सोयीसाठीच १७ जिल्ह्यात सदर पादुका रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
