पुणे, 16 फेब्रुवारी (हिं.स.)।
मावळ लोकसभा मतदार संघात २०१९ मध्ये निवडून येवून राजकारणाचा श्रीगणेशा करण्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांचे स्वप्न भंग पावल्याने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून राजकारणापासून दूर असणारे पार्थ पवार हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी आता नागरिकांशी गाठीभेटी घेत लोकसंपर्काला सुरूवात केल्याने अजित पवार यांचा राजकारणाचा वारसा पार्थ पवार यांच्याकडे देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.पार्थ पवार यांचा सक्रिय राजकारणाचा प्रारंभ हा मावळ लोकसभा मतदार संघात पराभवाने झाला. अजित पवार यांचे प्राबल्य असलेल्या पिंपरी – चिंचवड परिसरातील मावळ लोकसभा मतदार संघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना राजकारणात आणण्याचे अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वप्न भंगले. तेव्हापासून पार्थ पवार हे विजनवासात होते. नुकत्याच उघडकीस आलेल्या मुंढवा जमीन विक्री प्रकरणानंतर ते चर्चेत आले. अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येऊ लागले आहेत. नागरिकांशी संवाद साधणे, राजकीय व्यक्तींच्या गाठीभेटी घेत आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
