स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम
नागपूर, 09 जानेवारी (हिं.स.) : नागपुरात स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारे गेल्या काही महिन्यांमध्ये 75 हजाराहून अधिक नागरिकांची निःशुल्क नेत्रतपासणी करण्यात आली.
नंदनवन येथे आयोजित शिबिरात आज, मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गरजूंना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी 75 हजार नेत्र तपासण्या पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. संस्थेने नेत्र, दंत, कर्ण तपासणी अभियानांतर्गत एक लाखांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा नागपूरकरांसाठी 27 मेपासून नेत्र तपासणी अभियान सुरू करण्यात आले. आतापर्यंत संपूर्ण नागपूर शहरात 503 नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याच मालिकेत आज, मंगळवारी संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त नंदनवन येथील संत जगनाडे महाराज चौक येथे आयोजित आरोग्य शिबिरात 75 हजार नेत्र तपासण्या पूर्ण झाल्या. या शिबिराला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार कृष्णा खोपडे यांनी भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गरजू लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. नागपुरातील नागरिकांसाठी 27 मे रोजी नेत्र सेवा संकल्प सुरू करण्यात आल्यानंतर 503 शिबिरांमध्ये एकूण 75 हजार 633 लोकांची निःशुल्क नेत्रतपासणी करण्यात आली असून यातील 7 हजारांहून अधिक लोकांना अत्यल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. यासोबतच 2300 हून अधिक रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिबीर संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे, डॉ. गिरीश चरडे, विलास सपकाळ, डॉ. अजय सारंगपुरे, डॉ. संजय लहाने, डॉ. अवंतिका वाडेकर, डॉ. समीक्षा आदी मंडळी कार्यरत आहेत.
संस्थेद्वारे 3867 रुग्णांची कर्ण तपासणी करुन 156 रुग्णांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते माफक दरात डिजिटल कर्णयंत्र देण्यात आले. तसेच 3456 नागपूरकरांची निःशुल्क दंत तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच 30 डिसेंबर 2023 पासून नागपूरकरांसाठी निःशुल्क कर्करोग तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण नागपुरात शिबिरे आयोजित करण्यात येत असून त्यालाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
हिंदुस्थान समाचार
