धुळे, 23 ऑक्टोबर (हिं.स.) धुळे जिल्ह्यातील सद्यस्थितीत सुरु असलेली अनुसूचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्रातील ) पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदे भरती प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगीत करण्यात येत आहे. तर अनुसूचित क्षेत्राबाहेरील (पेसा क्षेत्राबाहेरील ) पोलीस पाटील व कोतवाल भरतीची पुढील प्रक्रिया नियोजीत वेळापत्रकानुसार सुरु राहणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी नितीन गावंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी श्री.गावंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, धुळे जिल्ह्यातील धुळे व शिरपूर उपविभागातील कोतवाल व पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरतीसाठी 4 ऑक्टोंबर, 2023 पासून 15 ऑक्टोंबर, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार धुळे जिल्ह्यात पोलीस पाटील, कोतवाल संवर्गातील रिक्तपदाची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पोलीस पाटील, कोतवाल पदासाठी 29 ऑक्टोंबर, 2023 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या 13 ऑक्टोंबर, 2023 व महसुल व वनविभागाच्या 17 ऑक्टोंबर, 2023 च्यापत्रानुसार बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया,नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार पोलीस पाटील व कोतवाल हे पद देखील अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गाच्या सूचीतील असल्याने धुळे जिल्ह्यातील सद्यस्थितीत सुरु असलेली फक्त अनुसुचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्रातील) पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदे भरती प्रक्रिया पुढील आदेशापावेतो स्थगीत करण्यात येत आहे. अनुसूचित क्षेत्राबाहेरील ( पेसा क्षेत्राबाहेरील ) पोलीस पाटील व कोतवाल भरतीची पुढील प्रक्रिया नियेाजन वेळापत्रकानुसार सुरु राहणार आहे. असे अपर जिल्हादंडाधिकारी नितीन गावंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
हिंदुस्थान समाचार
