नाशिक, १८ जानेवारी (हिं.स.) : कोणत्याही नियमाचे पालन न करता ड्रिंकिंग वॉटर तयार करणाऱ्या इगतपुरी येथील कंपनी वरती अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून लाखो रुपयाचे पाणी जप्त केले आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न), उ.सि. लोहकरे समवेत अन्नसुरक्षा अधिकारी गो. वि. कासार, यांनी जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे दि. 18. जानेवारी रोजी मे. साईमेवा फुड अॅण्ड बेव्हरजेस, येथे छापा टाकला असता त्याठिकाणी तपासणीत या ठिकाणी पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरची निर्मिती ही विना बीआयएस प्रमाणपत्र तसेच आक्षेपार्ह लेबल असलेले, मिथ्याछाप व लेबलदोषयुक्त साठा आढळून आला.हे उल्लंघन कायदयानुसार आक्षेपार्ह असल्याने अन्न सुरक्षा अधिकारी कासार यांनी कमीदर्जा व असुरक्षित पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरच्या साठा असल्याच्या संशयावरुन नमुने घेवून पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरच्या एकुण 21324 पॅक बॉटल्स 1 लिटरच्या, किंमत रु.4 लाख 26 हजार ,488 व छापलेले लेबल्स, 26 रोल्स्, किंमत रु.19 हजार 110 रुपयेअसा एकुण किंमत रु.4 लाख45 हजार 598 रुपये इतक्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असून घेतलेले नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांचेकडे पाठविण्यात येणार आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई घेण्यात येईल.ही कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
