पुणे 17 ऑक्टोबर (हिं.स) हडपसर- सासवड पालखीमार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 दर्जा मिळालेला असला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या मार्गाच्या देखभाल दुरूस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.गेली कित्येक वर्ष या मार्गाचे काम झाले नसल्याने खड्डेच खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर खड्डे मरुम तसेच माती टाकून तात्पुरते बुजविण्यात आले. परंतु, अनेक ठिकाणी मुरूम तसेच माती निघून पुन्हा खड्डे तयार झाले आहेत.
राष्ट्रीय महमार्गाच्या कामासाठी मुरूम आणि मातीचा वापर होत असल्याने स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे सदर स्थिती कळविली आहे. हडपसर-सासवड महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल असला तरी वाहतूक कोंडी, खड्डे, दगड-गोटे, चिखल, घाणपाणी, अरुंद रस्ता या समस्या काही सुटलेल्या नाहीत.
हिंदुस्थान समाचार
