मुंबई, ७ ऑक्टोबर (हिं.स.) : मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण पीएमएलए कोर्टाकडून नोंदवण्यात आले आहे. मुश्रीफ यांचे पीए आणि निकटवर्तीय महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना न्यायालयाने ही टीप्पणी केली आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये गुंतवल्याचेही म्हटले आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणावरील सुनावणी सध्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुरू आहे. यापूर्वी पीएमएलए कोर्टाने मुश्रीफ यांनाही अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला असून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यानंतर मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यापाठोपाठ आता महेश गुरवही अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुश्रीफ पिता-पुत्रांनी मिळून घोटाळा केला आहे. त्यामुळे कोणालाही अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान मुश्रीफ यांच्या तीनही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने तिघांच्याही अटकपूर्व जामीनावरील निकाल राखून ठेवला आहे. पुढच्या आठवड्यात तिघांच्याही अटकपूर्व जामीनावरील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुश्रीफ कुटुंबीय आणि निकटवर्तीय यांच्या अडचणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा – वडेट्टीवार
दुसरीकडे मुश्रीफ यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. मुश्रीफ यांच्याबाबत पीएमएलए कोर्टाने अत्यंत गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निरीक्षणातून आता स्पष्ट झाले आहे. सरकारला शेतकऱ्यांबद्दल कणव असेल, तर शेतकऱ्यांना फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हिंदुस्थान समाचार
