अमरावती, 3 डिसेंबर (हिं.स.)
हमालपुरा मुख्य रस्त्याला लागून असलेल्या चांडक टॉवर नामक इमारतीचा दर्शनी भागातला मुख्य पिल्लर अचानक खचल्याने चांगलीच खळबळ उडाली. महापालिकेने सदर इमरातीचा ताबा घेतला असून ती खाली करण्यात आली आहे. मनुष्य वापरावर बंद खालण्यात आली आहे. बांधकाम अंकेक्षणाचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
चांडक टॉवर इमारतीत एकूण आठ सदनिका आहे. तळमजल्यावर वाहनतळ व दुकानासाठी दोन गाळे आहे. ही इमारत गोविंद चांडक यांच्या मालकीची आहे. 2018 मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. या इमारतीच्या तीन सदनिकांमध्ये वेगवेगळ्या तीन वृत्तपत्रांचे कार्यालय भाडेतत्वावर आहे. उर्वरीत पाच सदनिकांमध्ये कुटुंब वास्तव्याला आहे. सांयकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान इमरतीच्या दर्शनी भागावर असलेला प्रमुख पिल्लर अचानक खचत असल्याचे काही जणांना दिसले. त्यांनी लगेच याच इमारतीतल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयातील कर्मचार्यांना दिली. त्यांनी पाहणी केली. रहिवाशी कुटुंबांना सांगण्यात आले. पटापट सगळे घाबरत घाबरत खाली उतरले. महापालिका प्रशासन, पोलिसांना माहिती देण्यात आली. काही क्षणातच सर्व यंत्रणा साधनसामुग्रीसह पोहचल्या. सर्व प्रथम त्यांनी ही इमारत निर्मनुष्य केली. प्रचंड रहदारीच्या रस्त्यावरच ही इमारत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. मनपाच्या अभियंत्यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी केली. पिल्लर खचल्याने इमरातीला काही ठिकाणी भेगा पडल्याचे दिसले. या इमारतीचे बांधकाम अंकेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अकोला येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पथक त्यासाठी येणार आहे. या पथकाचा अहवाल आल्यानंतरच इमारतीच्या वापरा संदर्भातला निर्णय घेण्यात येणार आहे. तात्पुरता उपाय म्हणून जो पिलर खचला आहे, त्या ठिकाणी लोखंडी पिलर (जॅक) स्वरूपात लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या इमारतीत राहणार्यांची व काम करणार्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे. प्रशासनाने त्यांना तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे. आवश्यक साहित्य काढून देण्यासाठी पथकातल्या सदस्यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. घटनास्थळी सर्व प्रमुख अधिकार्यांनी भेट दिली व पाहणी केली.
हिंदुस्थान समाचार
