सप्टेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात, साऱ्या जगाच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत. येथे यशोभूमी – आंतरराष्ट्रीय अधिवेशन व एक्पो सेंटर तंत्रज्ञान, महत्त्वाकांक्षा आणि जागतिक सहकार्याचे गजबजलेले केंद्र बनले आहे. सेमिकॉन इंडिया 2025 ही फक्त आणखी एक उद्योग परिषद नाही, तर तो एक इराद्याचा जाहीरनामा आहे. हा कार्यक्रम जगाला सांगतो की भारत आता केवळ प्रगत तंत्रज्ञानाचा ग्राहक राहून समाधानी नाही, तर निर्माता, उद्योजक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून सेमीकंडक्टर क्रांतीत पुढे येण्यासाठी सज्ज होत आहे.
या कार्यक्रमाचे प्रमाणच भारताच्या या ध्येयाची झलक देते. 20,000 हून अधिक सहभागी, 30 देशांमधून प्रतिनिधित्व करणाऱ्या 350 हून अधिक कंपन्या येथे एकत्र आल्या आहेत. कार्यशाळा, पॅनेल चर्चा, संवाद सत्रे आणि गोलमेज बैठका या सर्वांमध्ये सेमीकंडक्टर पुरवठा साखळीतील प्रभावशाली व्यक्ती सहभागी होत आहेत. विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींबरोबर खांद्याला खांदा लावून चालत आहेत, हे जाणून की ते भारताच्या तंत्रज्ञान प्रवासातील एका टप्प्याचे साक्षीदार आहेत.
सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे – भारताचा पहिला स्वदेशी अवकाशासाठी तयार चिप “विक्रम” चे अनावरण. विक्रम साराभाई स्पेस सेंटरने याची रचना केली आणि मोहाली येथील ISRO च्या सेमीकंडक्टर लॅबोरेटरीत याचे उत्पादन झाले. हा 32-बिट प्रोसेसर केवळ तांत्रिक यश नाही, तर भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे की उपग्रह, रॉकेट, संरक्षण प्रणाली, प्रगत वाहने आणि महत्त्वपूर्ण ऊर्जा पायाभूत सुविधांसाठी भारत स्वतःचे प्रोसेसर तयार करू शकतो. आतापर्यंत ही क्षमता परदेशातून आयात केली जात होती. विक्रम मुळे भारताने दाखवून दिले की तो आता जागतिक बाजारात एक नवनिर्माता म्हणून योगदान देऊ शकतो.
याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारताच्या ईशान्येकडील राज्य आसाम ने या परिषदेत मोलाची भूमिका निभावली. आसाममध्ये विकसित दोन चिप्स येथे प्रदर्शित झाल्या. त्यापैकी एक होती टाटा OSAT चिप (जगीरोड येथील सुविधा – जी दररोज लाखो चिप्सचे पॅकेजिंग व चाचणी करण्यास सक्षम आहे). दुसरी होती न्यूरल अॅम्प्लिफायर फ्रंटएंड IC (NIT सिलचर) – जी मेंदूतील न्यूरल सिग्नल्स वाढवून ब्रेन-कंप्युटर इंटरफेस आणि प्रगत वैद्यकीय उपयोगांसाठी उपयुक्त ठरू शकते. हे दाखवते की सेमीकंडक्टर क्षेत्रातील नवनिर्मिती भारतात फक्त एका भागापुरती मर्यादित नसून देशभर पसरत आहे.
गुजरात हा या कहाणीतील आणखी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला आहे. साणंद येथे CG-Semi च्या नेतृत्वाखाली नवीन OSAT पायलट लाईन उभारण्यात आली आहे. हे केंद्र भारतातील फॅबलेस डिझाइन कंपन्यांना जागतिक दर्जाची असेंब्ली व चाचणी क्षमता उपलब्ध करून देते. यासोबतच, सरकारने डिझाइन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (DLI) योजनेअंतर्गत 23 चिप डिझाइन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. 76,000 कोटी रुपयांहून अधिकच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) कार्यक्रमामुळे भारत आता खऱ्या अर्थाने सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि धोरणात्मक पायाभूत सुविधा उभारत आहे.
सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही विशेष महत्त्व मिळाले. न्यूयॉर्कच्या अल्बनी विद्यापीठ आणि रामैया युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, बेंगळुरू यांच्यात नवे भागीदारी जाहीर करण्यात आले. जानेवारी 2026 पासून भारतीय विद्यार्थी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि मेट्रोलॉजीमध्ये विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम करू शकतील. हे दाखवते की पायाभूत सुविधा व धोरणांइतकीच, किंबहुना त्याहून अधिक, मानवी भांडवल महत्त्वाचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचा सूर लावताना सेमीकंडक्टरना 21व्या शतकातील डिजिटल हिरे असे संबोधले. त्यांनी स्पष्ट केले की भारताचे ध्येय केवळ सहभागी होणे नाही, तर संपूर्ण सेमीकंडक्टर मूल्यसाखळीचे नेतृत्व करणे आहे. सध्या भारताची देशांतर्गत मागणी 45–50 अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि 2030 पर्यंत ती 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. जागतिक स्तरावर ही बाजारपेठ या दशकात एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे.
जगातील प्रवाह पाहणे उपयुक्त ठरते. तैवान अजूनही उत्पादनात अग्रणी आहे (TSMC सारख्या कंपन्या), दक्षिण कोरिया मेमरी चिप्समध्ये आघाडीवर आहे (सॅमसंग सारखे दिग्गज), अमेरिका डिझाइनमध्ये वर्चस्व राखतो (Intel, NVIDIA, Qualcomm) आणि युरोप ने आपला चिप्स अॅक्ट सुरु केला आहे. भारत, जो दीर्घकाळ आयातीवर अवलंबून होता, आता जागतिक पुरवठा साखळीतील विश्वासार्ह पर्याय म्हणून उभा राहतो आहे.
भारताची खरी ताकद त्याच्या प्रतिभावान मनुष्यबळात आहे. दरवर्षी लाखो अभियंते भारतीय विद्यापीठांतून पदवीधर होतात. त्यापैकी अनेकांनी आधीच सिलीकोन व्हॅली, तैवान आणि युरोपमधील सेमीकंडक्टर कंपन्यांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सेमिकॉन इंडिया हीच प्रतिभा परत देशात वळविण्याचा प्रयत्न आहे – ज्यामुळे उच्च दर्जाच्या नोकऱ्या, स्टार्टअप्स आणि संशोधनाच्या संधी इथेच निर्माण होतील.
भारतीय तरुणांसाठी संधी अमर्याद आहेत. नवीन फॅब्रिकेशन आणि डिझाइन हब हजारो नोकऱ्या निर्माण करतील. AI, इलेक्ट्रिक वाहने आणि आरोग्य क्षेत्रासाठी चिप्स डिझाइन करणारे स्टार्टअप्स DLI योजनेअंतर्गत निधी व मार्गदर्शन मिळवत आहेत. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना जागतिक प्रयोगशाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे. कार्यक्रमातील वर्कफोर्स डेव्हलपमेंट पॅव्हिलियन थेट उद्योगतज्ज्ञांकडून करिअर मार्गदर्शन व कार्यशाळा पुरवत आहे.
जे प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर राहू शकत नाहीत त्यांच्यासाठीही अनेक मार्ग खुले आहेत. IIT, IISc आणि इतर अनेक विद्यापीठे VLSI डिझाइन व सेमीकंडक्टर तंत्रज्ञानात अभ्यासक्रम देत आहेत. रामैया–अल्बनी भागीदारीमुळे जागतिक दर्जाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची भर पडेल. सरकारी कौशल्य प्लॅटफॉर्मवर चिप डिझाइन व चाचणीचे मूलभूत अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध आहेत. गुजरात व आसाममधील नवीन प्रकल्प असलेल्या मोठ्या कंपन्या इंटर्नशिप प्रोग्राम्स सुरु करणार आहेत. कोर्सेरा आणि edX सारखे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म जागतिक दर्जाचे शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देत आहेत.
निष्कर्ष स्पष्ट आहे – भारत जगातील सर्वात मोठ्या चिप आयातदारांपैकी एक राहण्यापासून आता एक महत्त्वाचा उत्पादक आणि निर्यातदार होण्याकडे वाटचाल करत आहे. सरकारने वित्तीय व धोरणात्मक प्रोत्साहने दिली आहेत. उद्योगाने गुंतवणूक केली आहे. विद्यापीठे प्रतिभावान मनुष्यबळ तयार करत आहेत. आता ही संधी साधण्याची जबाबदारी भारताच्या तरुणांवर आहे.
सेमिकॉन इंडिया 2025 ने या दृष्टिकोनाला मूर्त रूप दिले आहे. मेेड इन इंडिया चिप्स ज्या दिवशी जगभरातील स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहने, उपग्रह आणि वैद्यकीय उपकरणांना चालना देतील, तो दिवस आता स्वप्न राहिलेला नाही – ती झपाट्याने आकार घेत असलेली वास्तविकता आहे. जर हे गतीमान राहिले, तर भविष्यातील डिजिटल हिरे कदाचित भारतातूनच सर्वाधिक तेजाने चमकतील.
