मुंबई, 2 सप्टेंबर (हिं.स.)बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन शीर्षक प्रायोजकासाठी अर्ज मागवले आहेत. बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ राष्ट्रीय संघाच्या प्रमुख प्रायोजक हक्कांसाठी अभिव्यक्ती जारी करण्याची घोषणा करत आहे. संसदीय कायद्याने रिअल मनी-आधारित ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातल्यामुळे ड्रीम११ ने बीसीसीआयला हे कळवल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.
बीसीसीआयने जारी केलेल्या निविदेत म्हटले आहे की, अल्कोहोल, तंबाखू, बेटिंग, रिअल मनी गेमिंग (फँटसी स्पोर्ट्स गेमिंग वगळता), क्रिप्टोकरन्सी आणि पोर्नोग्राफी किंवा सार्वजनिक नैतिकतेला धक्का पोहोचवणाऱ्या कंपन्यांचा या बोलीत समावेश केला जाणार नाही. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन करून ही माहिती दिली आहे. बीसीसीआयने निविदा भरण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबरपर्यंत निश्चित केली आहे.तर बोली सादर करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर आहे.
ड्रीम११ चा बीसीसीआयसोबत २०२३ ते २०२६ पर्यंत ४४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे ३५८ कोटी रुपये) चा करार होता. आणखी एका फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म, माय११सर्कल सोबत, दोन्ही कंपन्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रायोजकत्व आणि आयपीओद्वारे बीसीसीआयला सुमारे १००० कोटी रुपयांचे योगदान दिले.
बीसीसीआय आता २०२५ ते २०२८ पर्यंतच्या १४० सामन्यांसाठी प्रायोजक शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ड्रीम११ ने बोर्डाला दिलेल्या रकमेपेक्षा हा एक चांगला करार असेल. हे प्रायोजकत्व देशांतर्गत आणि परदेशी द्विपक्षीय सामन्यांसाठी तसेच आशियाई क्रिकेट परिषद आणि आयसीसी द्वारे आयोजित बहुसंघीय स्पर्धांसाठी असेल.
बीसीसीआयने प्रत्येक द्विपक्षीय सामन्यासाठी ३.५ कोटी रुपये आणि आयसीसी आणि एसीसी सामन्यांसाठी १.५ कोटी रुपये देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जे ड्रीम११ पेक्षा जास्त आहे पण बायजूकडून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कमी आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
