केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पाठवले पत्र
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर (हिं.स.) : मणिपूरमधील कुकी आणि मैतेई समुदायातील हिंसाचाराची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने (आयटीएलएफ) केलीय. याबाबत संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आपल्या मागण्यांचे पत्र पाठवले आहे.
या पत्रात आयटीएलएफने म्हंटले आहे की, कुकी आणि मैतेई समुदायांमधील हिंसाचाराची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे. या चौकशीनंतरच आरोपी समोर येतील. येत्या 2 आठवड्यात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आमचे स्वशासन स्थापन करु. मग केंद्र सरकारने आमच्या स्वशासनाला मान्यता देवो अगर न देवो. अशी धमकी देखील आयटीएलएफने दिली आहे. मणिपूर सरकारने 3 मे रोजी झालेल्या हिंसाचारामुळे प्रभावित कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूर (एटीएसयूएम) च्या आदिवासी एकता मोर्चानंतर उसळलेल्या हिंसाचारात ज्यांची घरे जळून खाक झाली किंवा जाळपोळ झाली, अशा विस्थापित कुटुंबांसाठी सरकारने कायमस्वरुपी गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे.
दुसरीकडे, मणिपूरच्या खोऱ्यात आणि डोंगराळ भागात झालेल्या हिंसाचारात सुमारे 5 हजार घरांचे नुकसान झाले आहे. या योजनेंतर्गत ज्यांची पक्की घरे जळाली किंवा नुकसान झाले अशा बाधित कुटुंबांना 10 लाख रुपये दिले जातील. ज्या कुटुंबांची अर्धी घरे जळाली किंवा नुकसान झाले त्यांना 7 लाख रुपये दिले जातील, तर ज्यांची कच्ची (तात्पुरती) घरे दंगलीत जळाली किंवा नुकसान झाले अशा बाधित कुटुंबांना 5 लाख रुपये दिले जातील. पॅकेजच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम अंशतः नुकसान झालेल्या किंवा जळालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी दिली जाईल.
हिंदुस्थान समाचार
