सोलापूर , 16 नोव्हेंबर (हिं.स.) दारूच्या नशेत घरातील लोकांना त्रास देणा-या बापाचा मुलानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात सोलापूर ग्रामीण पेालिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. मागील अनेक वर्षापासून घरातील लोकांना दारू पिऊन शिवीगाळ व त्रास देत असल्याने त्याच त्रासास कंटाळून मी वडिलांची हत्या केल्याची कबुली मुलाने पोलिसांसमोर दिली.
दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात व्यक्तीचा खून केल्याची घटना पोलिसांना कळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जलदगतीने तपास करण्यास सुरूवात केली. दरम्यान, या गुन्हयातील अनोळखी व्यक्ती ही कोंडबावी (ता. माळशिरस) या गावातील असल्याची माहिती मिळाली. मयताचा मुलगा सुरज सावंत याने प्रेत ओळखून माझे वडिल पांडूरंग चंद्रकांत सावंत याचेच प्रेत असल्याचे सांगितले. तेंव्हा मयताचा मुलगा सुरज पांडूरंग सावंत (२४) याने अज्ञात व्यक्तीविरूध्द फिर्याद दिली होती.
हिंदुस्थान समाचार
