पाटणा, 03 जानेवारी (हिं.स.) : बिहारच्या पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज, बुधवारी आपातकालीन स्थितीत उतरवण्यात आले. घटनेच्या वेळी विमानात कॅबिन-क्रूसह 187 प्रवासी होते. विमानाच्या सुखरूप लँडिंगनंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
यासंदर्भातील माहितीनुसार इंडिगोच्या (फ्लाईट क्र. 6ई-2074) विमानाने आज, बुधवारी बिहारच्या पाटणा विमानतळाहून दुपारी 12:58 वाजता दिल्लीसाठी उड्डाण केले. हे विमान जमिनीपासून काही अंतराव आकाशात असतानाच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे आढळून आले. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच वैमानिकाने तत्काळ पाटणा विमानतळाशी संपर्क साधला. याबाबत माहिती मिळताच पाटणा विमानतळावरील यंत्रणांना आपातकालिन परिस्थीतीसाठी सज्ज ठेवण्यात आले. त्यानंतर दुपारी 13:33 वाजता हे विमान पाटणा विमानतळावर सुखरूप उतरवण्यात आले. याबाबत पाटणा विमानतळ संचालकांनी सांगितले की, पाटणा-दिल्ली इंडिगो फ्लाईटमध्ये (क्र. 6ई-2074) उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यानंतर वैमानिकाच्या विनंतीनुसार या विमानाची तत्काळ इमर्जन्सी लँडिंग करवण्यात आली. सध्या विमानातील तांत्रिक अडचण दूर केली जात असून सर्व 187 प्रवासी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
