नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : देशातील 6 राज्यांमध्ये आज, शनिवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यानुसार पुढील 24 तासांत तामिळनाडू, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश आणि दक्षिण राजस्थानमध्ये गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल असे हवामान खात्याने (आयएमडी) म्हंटले आहे.
तामिळनाडूच्या अनेक भागात आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर तामिळनाडूमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मुंबई आणि दिल्लीत हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पर्वतीय भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पर्वतीय भागातील बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यासोबतच तामिळनाडू आणि केरळ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर-मेट्टुपालयम राष्ट्रीय महामार्ग आणि कोठागिरी-मेटुपलायम महामार्गावर सुमारे 10 ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.
हिंदुस्थान समाचार
