नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर (हिं.स.) : भारताचे अन्न प्रक्रिया क्षेत्र वेगाने नवीन उद्योग म्हणून उदयास आले आहे. गेल्या 9 वर्षांत या क्षेत्रात 50 हजार कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक आल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2023 च्या दुसऱ्या आवृत्तीचे आज, शुक्रवारी पंतप्रधानांनी उद्घाटन केले. या कार्यक्रमात 80 हून अधिक देशांतील 1200 हून अधिक लोक सहभागी झाले होते.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, कृषी निर्यातीत प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वाटा 13 वरून 23 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 9 वर्षात प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत 150 टक्के वाढ झाली आहे. कृषी निर्यातीत आपण जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर आलो आहोत.
अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये भारताने प्रगती केली नाही. अन्न क्षेत्राशी संबंधित प्रत्येक कंपनीसाठी ही सर्वोत्तम स्टार्टअप संधी आहे. वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमात पंतप्रधानांनी फूड स्ट्रीटचे उद्घाटनही केले. केंद्रीय अन्न मंत्री पशुपती कुमार पारस यांनी परदेशी गुंतवणूकदारांना भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारोप होईल. वर्ल्ड फूड इंडियाची पहिली आवृत्ती 2017 मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात 918 किलो खिचडी तयार करण्यात आली होती.
हिंदुस्थान समाचार
