नांदेड, महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस, असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत, पण तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती आहे. हे तीन अर्धे मिळून महाराष्ट्राचं भलं करतील का? या ऑटो रिक्षाला कोणतीच दिशा नाही. या रिक्षाचं भविष्य स्पष्ट आहे. निवडणुकीनंतर आपापसातील मतभेदामुळे हे लोक तुटणार आहेत, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली. नांदेडमध्ये महायुतीचे (भाजप) उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची आज, गुरुवारी सभा पार पडली.
शाह म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना अर्धी राहिलीय. शरद पवार यांची राष्ट्रवादी अर्धी राहिलीय, हे अर्धे होतेच, पण या दोघांनी मिळून काँग्रेसला अर्ध करण्याचं काम केलंय. हे तीन अर्धे मिळून महाराष्ट्राचं भलं करतील का? ही एक अशी ऑटो रिक्षा आहे, जिचे तीन पाय आहेत, पण गवर्नर अम्बेसिडरचं आहे, गिअरबॉक्स फियाटचं आहे आणि उर्वरित इंजिन मर्सिडीजचं आहे.
महाराष्ट्राचा विकास हे तीन पक्ष करू शकत नाहीत, हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल, तर भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्रात तीन नकली पक्ष एकत्र आले आहेत. या तिघांची ऑटो आहे, मात्र यांचे काही खरे नाही. शरद पवार हे दहा वर्षे केंद्रात मंत्री होते, पण त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा. दुसरीकडे वातावरण बिघडले आहे असे काँग्रेसवाल्यांना वाटते, मात्र नांदेडमध्ये भाजपचेच वातावरण आहे. ही निवडणूक मोदींना पंत्रप्रधान करण्याची आहे. प्रतापराव यांना मत म्हणजे मोदींना मत. मनमोहन सिंग यांनी आपली अर्थव्यवस्था ११ व्या नंबरला सोडून गेले होते, ती आज पाचव्या स्थानावर आली आहे.
मी शरद पवार यांना विचारु इच्छितो, एक गोष्ट सांगा, १० वर्षांपर्यत तुम्ही सोनिया-मनमोहन सरकारचे कर्ताधर्ता होते, तु्म्ही १० वर्षांत महाराष्ट्राला काय दिलं? नांदेडकरांनो हिशोब मागायला हवा की नाही? त्यांनी हिशोब द्यायला हवा की नको? पण ते देणार नाहीत. पण मी हिशोब देवून जातो. त्यांनी १० वर्षांत महाराष्ट्राला १ लाख ९१ हजार कोटी रुपये दिले होते. नरेंद्र मोदी सरकारने १० वर्षांत ७ लाख १५ कोटी रुपये दिले आहेत. त्याऐवजी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ३ लाख ९० हजार कोटी रुपये दिले. ७५ हजार कोटी रुपये राष्ट्रीय महामार्गासाठी, २ लाख १० हजार कोटी रुपये रेल्वेसाठी, ४ हजार कोटी रुपये विमानतळासाठी आणि १ लाख कोटी रुपये विशेष पायाभूत प्रकल्पांसाठी देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाची मंडळी महाराष्ट्राचा विकास करु शकत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचा विकास करु शकतात, असा दावा शाह यांनी केला.
खर्गे म्हणतात, काश्मीरचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध? पण काश्मीर हे पूर्ण देशाचं आहे, याच्या सुरक्षेसाठी नांदेडचा तरूण तयार आहे. मी नांदेडच्या नागरिकांना विचारु इच्छितो, काश्मीर आपलं आहे की नाही? काँग्रेसने ७० वर्षांत ३७० कलम हटवले नाही. दहा वर्षे मनमोहन-सोनिया यांनी सरकार चालवले, तेव्हा बाहेरून लोक यायचे आणि इथे घातपात करायचे. मोदींच्या काळात पुलवामा हल्ला झाला, मात्र मोदींनी त्यांच्या घरात घुसून त्यांना मारले. जगाला मोदींनी मोठा संदेश दिला आहे, आमच्या वाटेला जर कुणी आला तर आम्ही त्याला सोडणार नाही.
