डीआरआय आणि कोस्ट गार्डची संयुक्त कारवाई
चेन्नई, 06 मार्च : तामिळनाडूच्या मंडपम समुद्र किनाऱ्यावर एका बोटीतून 99 किलो चरस जप्त करण्यात आली. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 108 कोटी रुपये आहे. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) आणि इंडियन कोस्ट गार्ड यांनी संयुक्तपणे ही कारवाई केलीय.
यासंदर्भात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मंडपम समुद्रकिनाऱ्या जवळील तटीय मार्गाने भारतातून श्रीलंकेत अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर अधिकाऱ्यांनी 4 आणि 5 मार्चच्या मध्यरात्री किनारपट्टीवर लक्ष ठेवून अमली पदार्थ जप्त केले. खोल समुद्रात पाळत ठेवत असताना, महसूल गुप्तचर संचालनालय आणि तटरक्षक दलाने श्रीलंकेच्या दिशेने जाणारी एक बोट दिसली आणि लांबपर्यंत पाठलाग करून ती अडवली. बोट पकडल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली असता त्यात दडवलेल्या अंमलीपदार्थांच्या 5 पिशव्या सापडल्या. ड्रग्ज आणि बोटीवरील 3 जणांना पुढील तपासासाठी मंडपम येथील तटरक्षक केंद्रात आणण्यात आले. या ड्रग्जने भरलेल्या पिशव्या पंबन किनारी भागातील एका व्यक्तीने दिल्या आणि श्रीलंकेतील अज्ञात व्यक्तीला देण्यास सांगितले होते अशी माहिती बोटीवरील तिघांनी दिली. यानंतर डीआरआयने या व्यक्तीला पंबन परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत ही व्यक्ती भारतातून श्रीलंकेत किनारी मार्गाने अमली पदार्थांच्या तस्करीचा म्होरक्या असल्याचे उघड झाले. ड्रग्ज श्रीलंकेत पोहोचवण्यासाठी देशाच्या विविध भागातून आणल्याचे तपासात उघड झाले आहे.
