मकवाल चौकीवर केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू, 14 फेब्रुवारी : पुलवामाच्या भ्याड हल्ल्यांला 5 वर्ष पूर्ण झाले असताना आज, बुधवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. जम्मू-काश्मिरातील मकवाल चौकीवर पाकिस्तानी रेजर्सनी गोळीबार केला. याता सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सुदैवाने भारतीय बाजूने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
यासंदर्भात बीएसएफकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 20 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत. तसेच आज, बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी पुलवामाच्या भ्याड हल्ल्याला 5 वर्षे पूर्ण झालीत. यापार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी 5.50 वाजता पाकिस्तानी रेंजर्सने गोळीबार सुरू केला. हा गोळीबार तब्बल 20 मिनीटे सुरू होता. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर भारतीय जवानांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय गोळीबारानंतर पाकिस्तानच्या बंदुका थंडावल्यात.
गेल्या वर्षी 8-9 नोव्हेंबरच्या मध्यरात्री सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तान रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. 25 फेब्रुवारी 2021 रोजी दोन्ही देशांनी नव्याने युद्धविरामावर सहमती दर्शविल्यानंतर मृत्यूची ही पहिलीच घटना होती. जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये 26 ऑक्टोबर रोजी सीमापार गोळीबारात दोन बीएसएफ जवान आणि एक महिला जखमी झाली होती, तर 17 ऑक्टोबरला अशाच एका घटनेत आणखी एक बीएसएफ जवान जखमी झाला होता. दरम्यान बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर सीमेवर हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय.
