केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे किमान वय 6 वर्षे असावे असे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. याबाबत केंद्राने सर्व राज्यांना पत्र पाठवून निर्देश जारी केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, सर्व शाळांनी प्रवेशाच्या वेळी मुलांचे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशाचे वय किमान 6 वर्षे असल्याची खात्री करावी. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी किमान वय प्रत्येक राज्यांत वेगवेगळे आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शासनाने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेताना मुलाचे वय 6 वर्षे ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचे पालन केले जात नाही. देशातील आसाम, गुजरात, पुद्दुचेरी, तेलंगणा, लडाख, आंध्र, दिल्ली, गोवा, राजस्थान, उत्तराखंड, हरयाणा, केरळ, झारखंड, कर्नाटक या राज्यांमध्ये 6 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांना पहिलीत प्रवेश दिला जात आहे.
