स्वयंसेवक ते उपपंतप्रधान विलक्षण कारकीर्द
नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : आधुनिक लोहपुरुष, निस्सीम रामभक्त आणि भाजपचे सच्चे कार्यकर्ते अशी बिरूदावली लाभलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना आज, शनिवारी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला. या पुरस्काराच्या निमित्ताने शतकाच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या अडवाणींच्या जीवनप्रवासाची पाने उलटल्या गेलीत.
देशात 1990च्या दशकात जन्माला आलेल्या पिढीला ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी उपपंतप्रधान अशी अडवाणींची ओळख आहे. परंतु, अडवाणींचे कार्यकर्तृत्व अवघ्या दोन बिरुदावलीत गुंडाळण्यासारखे नाही. भाजप सत्तेपासून फार लांब असताना अडवाणींनी तीन दशके खासदारपद भूषवले. तसेच ते सर्वाधिक काळ भाजपचे अध्यक्ष होते. भाजपच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या अडवाणींचा जन्म तत्कालिन अखंड भारताच्या सिंध प्रांतात (आताचा पाकिस्तान) 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. अडवाणी कराची येथील सेंट पॅट्रिक स्कूलचे विद्यार्थी होते. देशभक्तीच्या प्रेरणेने वयाच्या 14 व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. अडवाणी यांचे शालेय शिक्षण कराचीच्या सेंट पॅट्रिक हायस्कूलमध्ये झाले. भारत छोडो आंदोलनादरम्यान 1942 साली त्यांनी दयाराम गिदुमल नॅशनल कॉलेज, हैदराबाद (आता पाकिस्तानमध्ये) प्रवेश घेतला. त्यानंतर 1944 मध्ये त्यांनी कराचीतील मॉडेल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली.
धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाल्याव 1947 साली अडवाणी दिल्लीत आले. त्यांनी राजस्थानातून संघाचे प्रचारक म्हणून काम केले. त्यांनी 1947 ते 1951 या काळात राजस्थानच्या अलवर, भरतपूर, कोटा, बुंदी आणि झालावाड येथे संघ कार्याचा प्रसार, प्रचार आणि विस्तार केला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर 1951 मध्ये अडवाणी या पक्षात सहभागी झाले. त्यांची राजस्थानमधील पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 1957 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या मदतीसाठी ते दिल्लीला गेले. त्यानंतर 1970 ते 1989 ते राज्यसभेचे सदस्य राहिले. लालकृष्ण अडवाणी यांची 1975 मध्ये तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अटल बिहारींच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारमध्ये गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणूनही काम केले होते.
अडवाणी यांनी 1980 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत भाजपच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते भाजपच्या आक्रमक आणि लढाऊ हिंदुत्व विचारसरणीचा चेहरा म्हणून उदयास आले. त्यांनी 1990 च्या दशकात वाजपेयींसोबत पक्षाचा उदय घडवून आणला आणि 1984 च्या निवडणुकीत मिळालेल्या 2 जागांवरून 1992 पर्यंत भाजप 121 आणि 1996 मध्ये 161 जागांवर पोहचला. त्यावेळी भाजप लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष बनला होता. रामजन्मभूमी आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून लालकृष्ण अडवाणी देशभर ओळखले जातात. त्यांनी 25 सप्टेंबर 1990 रोजी गुजरातच्या सोमनाथ ते अयोध्या दरम्यान 10 हजार किलोमीटरची रथयात्रा काढली होती. राम मंदिर उभारणीच्या मोहिमेला पाठिंबा मिळवून देणे हा या यात्रेचा उद्देश होता. राजकारणासोबतच अडवाणी यांनी आतापर्यंत 6 विविध पुस्तके लिहीली आहेत. तसेच त्यांना उत्कृष्ट संसदपटू आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय. आता आयुष्याच्या शतकी वाटचालीत त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झालाय. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांनी कृतार्थ आणि साश्रुनयनांनी कृतज्ञता व्यक्त केलीय.
