बंगळुरू : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज, मंगळवारी मतदान झाले. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर येडीयुरप्पा यांनी राज्यात भाजप किमान 25 ते 26 जागा जिंकेल असा दावा केला.
कर्नाटकातील लोकसभेच्या 14 जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. यावेळी बीएस येडियुरप्पा यांनी शिवमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा येथे पुत्र व शिमोगा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार बी. वाय राघवेंद्र आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासमवेत मतदान केले. दरम्यान, राज्यात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. कर्नाटकातील बहुतांश दक्षिणेकडील आणि किनारी जिल्ह्यांमधील 14 इतर जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान झाले. मतदानानंतर येडीयुरप्पा म्हणाले की, राज्यातील लोकसभेच्या 28 पैकी 25 ते 26 जागा भाजप जिंकणार आहे. तसेच 26 रोजी मतदान झालेल्या सर्व 14 जागांवर विजयाचा आम्हाला विश्वास आहे. उरलेल्या एक-दोन जागांवर काही चढ-उतार झाले तरी माझ्या मते भाजप 25 ते 26 जागा जिंकेल असा दावा त्यांनी केला.
