सैन्य आणि संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप खुलासा नाही
नवी दिल्ली, 17 जानेवारी (हिं.स.) : भारत आणि चीन यांच्यात जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. त्यानंतरही 2 वेळी चीनने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारतीय सैन्याने तो उलथवून लावला. गेल्या 13 जानेवारी रोजी सैन्याच्या पुरस्कार वितरण समारंभात ही माहिती पुढे आली. परंतु, सैन्य किंवा संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत अद्याप कुठलेही स्पष्टीकरण पुढे आलेले नाही.
गेल्या आठवड्यात सैन्याच्या वेस्टर्न कमांडने आयोजित केलेल्या एका समारंभात भारतीय लष्करातील जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात एलएसीवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सैनिकांच्या आक्रमकतेचा भारतीय सैन्याने कसा प्रतिकार केला हे यावेळी सांगण्यात आले. चंडीमंदिर येथील लष्कराच्या मुख्यालयात झालेल्या या 13 जानेवारीच्या समारंभाचा व्हिडिओ वेस्टर्न कमांडने युट्यूब चॅनवर शेअर केला होता. ज्यात शौर्य पुरस्कारांबद्दल तपशीलवार माहिती देण्यात होती. मात्र, सोमवार, 15 जानेवारी रोजी व्हिडिओ हटवणयात आला. यावेळी नमूद करण्यात आले होते की, या चकमकी सप्टेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान घडल्या होत्या. चीनशी जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर, भारतीय लष्कराने 3,488 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनचा मुकाबला करण्यासाठी सैन्य सज्जता ठेवली आहे. गेल्या साडेतीन वर्षांत, भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये संघर्षाच्या अनेक घटना घडल्या आहेत. एलएसीच्या तवांग सेक्टरमध्येही चिनी सैन्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना झोडपून-झोडपून सीमे पलिकडे पिटाळले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 9 डिसेंबर 2022 रोजी संसदेत याबाबत माहिती दिली होती. दरम्यान 13 जानेवारी 2024 रोजी झालेल्या सैन्याच्या गॅलेंट्री अवार्ड वितरण सोहळ्यात उल्लेखीत चीनी घुसखोरीच्या घटनांबाबत संरक्षण मंत्रालयाकडून देखील कुठलेही वक्तव्य किंवा खुलासा करण्यात आलेला नाही.
हिंदुस्थान समाचार
