पुणे
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुका घोषित झाल्यापासून चर्चेत आहे. शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार कुटुंबातच चढा-ओढ निर्माण झालीये. पवार कुटुंबातच नणंद-भावजय यांच्यात लढत पाहायला मिळणार असून या निमित्ताने भावकीचा वादही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार प्रचार सुरूये तर शरद पवार यांच्याकडून त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांचा जंगी प्रचार सुरू आहे. अशातच सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीसाठी डमी अर्ज भरला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत दादांनी हा डमी अर्ज भरला आहे.
