नांदेड, फेब्रुवारी : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज,शुक्रवारी अहमदपूर येथे 190 किमी लांबीच्या 3946 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
अहमदपूर येथील भकतस्थळ येथे आयोजित राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी गडकरी म्हणाले की, विदर्भातील बुटीबोरी पासून कोकणापर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी नवीन लाईफ लाईन तयार झाली आहे. या रस्त्यामुळे कृषी उत्पादन बाजारपेठेला चालना मिळाली आहे. मागासलेल्या भागाच्या विकासासाठी या रस्त्याचा निश्चित उपयोग होईल. नागपूर ते रत्नागिरी 920 किमी लांबीच्या महामार्गासाठी 30 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील नांदेड येथील माहूरगड, तुळजापुर येथील तुळजाभवानी आणि कोल्हापुरातील महालक्ष्मी या 3 प्रमुख शक्तीपीठाना जोडणारा भक्ती मार्ग असणार आहे. जिल्ह्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून नांदगाव, सारोळा सह 22 ठिकाणी तलावाचे खोलीकरण करून 18.72 लाख क्युबिक मीटर पाण्याचे स्टोरेज वाढवून जलसंवर्धन करण्यात आल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधींनी जलसंवर्धन कामाकडे लक्ष द्यावे अशी विनंति त्यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांनी शेती समृध्द करण्यासाठीं बायोमास पासून डांबर, इथेनॉल तयार करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. पुढील काळामध्ये विमानाचे हवाई इंधन निर्माता म्हणून शेतकरी बनावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गडकरी यांच्या नेतृत्वात मागील 10 वर्षात नांदेड व लातूर जिल्हयात महामार्गाच्या कामाचे विस्तार केल्याबद्दल क्रीडा मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर श्रृंगारे आणि खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आभार मानले.यावेळी धाराशिव जिल्ह्यातील 122.9 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्पांचे भूमिपूजन ऑनलाईन करण्यात आले.
