नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्के वाढ केलीय. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए आता 42 टक्क्यांवरून वाढून 46 टक्के झालाय. हा डीए 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे.सरकारच्या या निर्णयाचा देशातील 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार असून त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जोरदार वाढ होणार आहे.
महागाई भत्त्यातील बदलाचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर दिसून येत आहे. त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारही वाढतो. यावर निर्णय घेण्याबाबत बोलताना, सरकार महागाई दराची आकडेवारी लक्षात घेऊन निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे. यासाठी सीपीआय-आयडब्ल्यू डेटा मानक मानला जातो. जुलै 2023 मध्ये, सीपीआय-आयडब्ल्यू 3.3 अंकांनी वाढून 139.7 वर पोहोचला होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास ती सुमारे 0.90 टक्के अधिक होती. यापूर्वी जून 2023 मध्ये ते 136.4 होते आणि मे महिन्यात ते 134.7 होते.
डीए वाढीनंतर केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात वाढ होणार आहे. जर एखाद्या कर्मचार्याचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल, तर कर्मचार्याचा महागाई भत्ता सध्या 42 टक्के दराने 7560 रुपये मिळतो. मात्र आता आणखी 4 टक्के वाढीनंतर ती रक्कम 8280 रुपये होईल. म्हणजेच त्यांच्या पगारात थेट 720 रुपयांची वाढ होणार आहे.
