सुरक्षा त्रुटीप्रकरणी चौकशी समिती स्थापन
नवी दिल्ली, 14 डिसेंबर (हिं.स.) : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही माहिती दिली आहे. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. तर संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री आज, गुरुवारी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे
केंद्रीय गृह खात्याने अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत. चौकशी समिती संसदेच्या सुरक्षेच्या भंगाच्या कारणांची चौकशी करेल, त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनांसह ही समिती आपला अहवाल लवकरात लवकर सादर करेल. संसद भवनात गोंधळ माजवण्याच्या उद्देशाने 4 नव्हे तर 5 जण आले होते, असा दिल्ली पोलिसांना संशय आहे. ललित झा असे या व्यक्तीचं नाव असून सध्या फरार आहे. अमोल शिंदे आणि नीलम सिंह जेव्हा संसदेबाहेर स्मोक कँडल फवारत होते, तेव्हा ललित त्यांचा व्हिडीओ काढत होता. अमोल आणि नीलमला पकडल्यावर ललित तिथून पळून गेला असा पोलिसांना संशय आहे. या चौघांचे फोन ललितकडे आहेत. दिल्ली पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 5 जणांचा मास्टरमाईंड कुणीतरी वेगळाच आहे, ही सहावी व्यक्ती या 5 जणांना रसद पुरवत होती, असाही पोलिसांना संशय आहे.
लोकसभेचे कामकाज सुरू असताना बुधवारी 13 डिसेंबर रोजी अचानक 2 जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावू लागले. संसदेत विषारी धूर सोडला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदार कोटक यांनी पकडले. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर मात्र प्रश्न उपस्थित झाले. धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले होते. त्यांच्याच शिफारसीवर आरोपीचा पास तयार करण्यात आला होता त्यामुळे या अनुशंगानेही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार
