– पंकजा मुंडेंसह समर्थकांसाठी मोठा धक्का
बीड, 10 जानेवारी (हिं.स.) – भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आता लिलावात काढला जाणार आहे. लिलावाची तारीख २५ जानेवारी ठरली असून ई लिवाव पद्धतीने कारखान्याची बोली लावली जाणार आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने कारखान्यावरील तब्बल २०३ कोटी ६९ लाख रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ही लिलावाची प्रक्रिया जाहीर केली आहे. हा कारखाना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारला होता. त्यांचा हा कारखाना प्राण असल्याची धारणा मुंडे समर्थकांची आहे. उपरोक्त कर्ज फेडावे या साठी बँकेने त्यांना वारंवार नोटिसा देखील बजावल्या होत्या. या सर्व घडामोडी पंकजा मुंडे यांच्यासह मुंडे समर्थकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
यांना बजावली नोटीस
लिलावाच्या नोटीसमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, श्रीनिवास दीक्षितुल्लू, ज्ञानोबा मुंडे, फुलचंद कराड, गणपतराव बनसोडे, जमनाबाई लाहोटी, केशव माळी, किसनराव शिंगारे, महादेवराव मुंडे, नामदेव आघाव, पांडुरंगराव फड, पंकजा मुंडे, परमेश्वर फड, प्रतापराव आपेट, आर.टी. देशमुख, शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, विवेक मोरे, व्यंकटराव कराड, यशश्री मुंडे यांच्या नावांचा नोटीसमध्ये कर्जदार, जामीनदार व तारणदार म्हणून उल्लेख आहे.
जीएसटी विभागाने देखील वैद्यनाथ कारखान्यास १९ कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. दरम्यान, ही रक्कम लोकवर्गाणीतून गोळा करण्याची तयारी नागरिकांनी दर्शवली होती. मात्र, याला पंकजा मुंडे यांनी नकार दिला होता. मात्र, आता ही मोठी थकीत रक्कम वसूलीसाठी आता बँकेने थेट कारखाना लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. कारखान्यावर छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बैंक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचे दोन वर्षांपासून २०३ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहेत. या रकमेवरील व्याज आणि इतर कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी बँकेने ई लिलाव जाहीर केला आहे. ही प्रक्रिया २५ जानेवारीला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
दरम्यान, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला हा कारखाना लिलावात निघणार असल्याने पंकजा मुंडे या अडचणीत सापडल्या आहेत. या कारखान्यात गोपीनाथ मुंडे यांची समाधी तसेच स्मारक उभारण्यात आले आहे. त्यांनी मराठवड्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा कारखाना उभारला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात कर्ज थकीत असल्याने आता हा कारखाना लिलावात निघणार आहे.
हिंदुस्थान समाचार
