रत्नागिरी, 18 जानेवारी (हिं.स.) : उद्धव ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी सुरू आहे. राजन साळवी आत्तापर्यंत 6 वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिले होते.
राजापूर येथील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळे निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत विभागाने काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. तसेच, काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले होते. राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणास्तव राजन साळवी यांच्या वहिनी चौकशीला गैरहजर राहिल्या होत्या. तर, साळवी यांचे बंधू आणि पुतणे चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत स्वतः राजन साळवीही उपस्थित राहणार आहेत. याबाबत राजन साळवी म्हणाले की, भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली, तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे साळवी म्हणाले होते.
हिंदुस्थान समाचार
