‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणी लोकपालांचे आदेश
नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर (हिं.स.) : ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणी लोकपालांनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भातील ट्विटमध्ये निशिकांत दुबे म्हणाले की, माननीय लोकपाल यांनी मी केलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी खासदार महुआ मोईत्रा यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामध्ये निशिकांत दुबे यांनीच महुआ मोईत्रा यांनी संसदीय आयडीचा आपला लॉगइन पासवर्ड शेअर केला होता, असा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्या संसदीय खात्यावर दुबईतून 47 वेळा लॉग-इन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. महुआ मोईत्रा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चौकशीचा सामना करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
