डंपरला धडकल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्स भस्मसात
भोपाळ, 28 डिसेंबर (हिं.स.) : मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री डंपरला धडकल्यानंतर बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या अपघातात 16 जण होरपळले असून 13 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
यासंदर्बात मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या गुना-आरोन रोडवर बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका डंपरने एका प्रवासी बसला धडक दिली. यानंतर बस पलटी होऊन त्यात आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या अपघातानंतर रुग्णवाहिका वेळ न पोहोचल्याचा आरोप केला जात आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडियाद्वारे या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, गुना ते आरोनला जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याने प्रवाशांचे नुकसान झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या हृदयद्रावक अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या परिस्थितीत राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मी प्रशासनाला जखमी प्रवाशांवर योग्य उपचार करण्याची तसेच अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात नमूद केलेय. तसेच अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केलीय. यासोबतच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भातील ट्विटर संदेशात शिंदे म्हणाले की, गुना-आरोन रोडवरील प्रवासी बसला आग लागल्याची बातमी दुःखद आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच गुना जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
