
नवी दिल्ली, २६ जानेवारी (हिं.स.) : भारताने आज आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर झालेल्या मुख्य समारंभात भव्य लष्करी परेड, सांस्कृतिक झांक्या आणि हवाई प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या परेडमधून भारताची वाढती लष्करी ताकद, स्वदेशी संरक्षण क्षमता आणि आत्मनिर्भर भारतची संकल्पना प्रभावीपणे जगासमोर मांडण्यात आली.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा (Santos da Costa) हे दोन परदेशी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारत आणि युरोपियन युनियनदरम्यान अपेक्षित व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. परंपरेनुसार, युरोपियन युनियनच्या एका लष्करी तुकडीनेही परेडमध्ये सहभाग नोंदवला.
‘ऑपरेशन सिंदूर’ ठरले विशेष आकर्षण
भारतीय सशस्त्र दलांच्या चित्ररथामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर : संयुक्ततेतून विजय’ या थीमचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या चित्ररथात थलसेना, नौदल आणि वायुदल यांच्यातील एकात्मता, अचूकता आणि स्वदेशी नवोपक्रमाचे दर्शन घडवण्यात आले. सीमापार दहशतवादी तळ आणि शत्रूच्या हवाई तळांवर केलेल्या निर्णायक कारवाईचे प्रतीकात्मक चित्रण या झांकीत करण्यात आले.
चित्ररथाच्या प्रारंभी भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यात आले, तर त्यानंतर सेनेच्या एम-777 अल्ट्रा-लाइट हॉवित्झर तोफा आणि आकाश हवाई संरक्षण प्रणाली सादर करण्यात आल्या. यामधून भारताची बहुस्तरीय आणि अभेद्य संरक्षण व्यवस्था अधोरेखित झाली.
स्वदेशी शस्त्रसज्जतेचे भव्य प्रदर्शन
परेडमध्ये ध्रुव हेलिकॉप्टर, रुद्र प्रहार, भीष्म व अर्जुन रणगाडे, धनुष तोफ, अमोघ बंदूक प्रणाली, ब्रह्मोस व आकाश क्षेपणास्त्रे, ATAGS आणि MRSAM यांसारखी अत्याधुनिक स्वदेशी शस्त्रे प्रदर्शित करण्यात आली. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’चा हा सशक्त प्रत्यय होता. परेडनंतर भारतीय वायुदलाने राफेल, सुखोई-30, मिग-29 आणि जॅग्वार अशा एकूण 29 लढाऊ विमानांचे संयुक्त उड्डाण सादर केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ थीमवरील विशेष फॉर्मेशनने उपस्थितांची मने जिंकली.
महिला सक्षमीकरणाचा ठळक संदेश
यंदाच्या परेडमध्ये महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. सीआरपीएफच्या पुरुष बटालियनचे नेतृत्व प्रथमच महिला अधिकारी असिस्टंट कमांडंट सिमरन बाला यांनी करून इतिहास घडवला. तसेच 148 मुलींच्या एनसीसी तुकडीने कर्तव्य पथावर संचलन केले.पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्या विशेष प्राण्यांच्या तुकडीने (बॅक्ट्रियन उंट, हंस आणि गरुड) परेडमध्ये सहभाग घेतला. तसेच भैरव लाइट कमांडो बटालियन आणि आधुनिक प्रणालींनी सुसज्ज ‘शक्तिबान’ आर्टिलरी रेजिमेंट यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.६१ कॅव्हलरीच्या घोडेस्वार पथकाचे प्रदर्शन हे परेडचे खास आकर्षण होते.
‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्धापन दिनाची थीम
यंदाचे प्रजासत्ताक दिन समारंभ ‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. विविध मंत्रालये आणि राज्यांच्या झांक्यांमध्ये या थीमचे प्रतिबिंब दिसून आले. स्टेज सजावट, निमंत्रण पत्रिका आणि कलाकृतींमध्येही ही संकल्पना ठळकपणे मांडण्यात आली. परेडसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. प्रथमच सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून एआय-सक्षम स्मार्ट चष्म्यांचा वापर करण्यात आला. सुमारे 10 हजार विशेष निमंत्रित, तसेच अंदाजे 30 हजार नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती लावली.एकूणच, 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा भारताच्या संरक्षण सामर्थ्य, राष्ट्रीय एकता, स्वदेशी तंत्रज्ञान आणि विकसित भारताच्या दिशेने वाटचाल यांचे भव्य दर्शन घडवणारा ठरला
——————-
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
