बेंगळुरू, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, शनिवारी भारतीय बनावटीच्या तेजस फायटर जेटमधून सफर केली. बंगळुरू येथील एचएएलच्या हबची पाहणी केल्यानंतर त्यांनी स्वदेशी बनावटीच्या तेजस फायटर जेटमधून उड्डाण केले. तेजस सफरचे फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत देशावासीयांचे अभिनंदनही केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सैन्य दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. भारतीय सीमेवर जाऊन भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवत जवानांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात, त्यांच्या कणखरपणाच्या पाठिशी संपूर्ण देश असल्याचा विश्वास देतात. कधी जंगलात जाऊन भ्रमंती करतात, तर कधी समुद्रात बोट सफारीचाही अनुभव घेतात. आता, थेट तेजस फायटर जेट चालवून मोदींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. भारतीय सैन्य दलात नव्याने दाखल झालेल्या तेजस या फायटर जेटची स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफर केली. मोदी बंगळुरूच्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमटेड (एचएएल) येथे पोहोचले होते. येथील मॅन्युफॅक्चरींग हबची त्यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे मोदींनी तेजस लढाऊ विमानातून उड्डाणही भरले.
मोदींनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना, हा अनुभव अविश्वसनीय असल्याचे सांगितले. या उड्डाणामुळे आपल्या देशातील स्वदेशी उत्पादनाच्या ताकदीवरील माझा विश्वास आणखी बळावला आहे. देशाच्या राष्ट्रीय क्षमतेचा आणि ताकदीचा मला अभिमान वाटत असून नवीन आशावादही निर्माण झाला आहे. संपूर्ण देशवासियांचे अभिनंदन असे म्हणत मोदींनी तेजस जेट उड्डाणानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. तर, डीआरडीओ, वायूदल आणि देशवासीयांचे अभिनंदन केले.तेजस हे युद्धात शत्रुवर जोरकसपणे तुटून पडणारे फायटर जेट आहे. वायूसेनेच्या लढाऊ विमानांमधील अत्याधुनिक जेट असलेल्या फायटरची सफर अनुभवत मोदींनी आनंद व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार
