भरतपूर, 10 जानेवारी (हिं.स.) : राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका खासगी बस कंडक्टरने एका प्रवासी महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून पोलिसांनी जितेंद्र गुर्जर नामक आरोपीला अटक केलीय.
यासंर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत महिला भरतपूर येथील रहिवासी असून ती जयपूर येथे वास्तव्याला आहे. घटनेच्या दिवशी 8 जानेवारी 2023 रोजी पिडीत महिला जयपूरहून भरतपूरला जाण्यासाठी संध्याकाळी एका खासगी बसमध्ये बसली. रात्रीच्या वेळी बस बयाना येथे पोहचली हा बसचा शेवटचा थांबा होता. याठिकाणाहून भरतपूरला जाण्यासाठी कोणतेही वाहन न मिळाल्याने पिडीतेने बस कंडक्टरला मदत मागितली. त्यावेळी आरोपीने महिलेला घरी सोडण्याचे आमिष दाखवत पुन्हा बसमध्ये बसवले. यावेळी त्याने धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार केला. यानंतर तो पीडितेला सोडून फरार झाला. पीडित महिलेने बयाना पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आरोपी जितेंद्र गुर्जरविरुद्ध भादंवि कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच गुन्हात वापरण्यात आलेली बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
हिंदुस्थान समाचार
