एकूण 7 ठिकाणी ईडीची तपासणी मोहिम
मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.) : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी आज, मंगळवारी सक्तवसुली संचनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. ईडीच्या 10 ते 12 अधिकाऱ्यांनी सकाळी आमदार वायकरांच्या मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील निवस्थानी तपासणी सुरू केलीय. यासोबतच वायकरांशी संबंधीत 7 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सुरू आहे. जोगेश्वरी परिसरातील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आलीय.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यामुळे रवींद्र वायकर लवकरच तुरुंगात जातील, असा इशाराही सोमय्या यांनी अनेकदा दिला होता. परंतु, वायकर यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, आज ईडीच्या पथकाने वायकर यांच्या घरावर धाड टाकून निर्णायक कारवाईच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. यापूर्वी संजय राऊत, अनिल परब या ठाकरे गटातील नेत्यांच्या घरी ईडीच्या धाडी पडल्या होत्या. यापैकी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती आणि त्यांना तब्बल 3 महिने तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. रवींद्र वायकर यांची यापूर्वी ईडी चौकशी झाली होती.
हिंदुस्थान समाचार
