आरा, २ नोव्हेंबर (हिं.स.) : जंगलराजवाल्यांचा जाहीरनामा म्हणजे खोटेपणा, फसवणूक आणि जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बिहारच्या आरा येथे आज, रविवारी आयोजित निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.
याप्रसंगी मोदी म्हणाले की, येत्या 6 नोव्हेंबरला तुमच्या भागात मतदान होणार आहे. आता फारसे दिवस उरलेले नाहीत. एनडीएने विकसित आणि आत्मनिर्भर बिहारसाठी एक प्रामाणिक व दूरदर्शी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. प्रत्येक वचन, प्रत्येक योजना बिहारच्या जलद विकासासाठी समर्पित आहे. एनडीएच्या संकल्पपत्रात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शेतीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. महिलांच्या आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी अनेक ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना पंतप्रधान म्हणाले की,एका बाजूला एनडीएचा प्रामाणिक जाहीरनामा आहे, तर दुसऱ्या बाजूला जंगलराजवाले आहेत. त्यांनी आपला जाहीरनामा खोटेपणा आणि दिशाभूल करणाऱ्या वचनांनी भरलेला दस्तऐवज बनवला आहे. पण जनता जागरूक आहे आणि ती सर्वकाही जाणते असे त्यांनी सांगितले. तसेच एनडीएच्या संकल्पपत्रातील आश्वासनांची पुनरुच्चार करत पंतप्रधान म्हणाले की, एनडीएचे संकल्प आहे की बिहारचा तरुण बिहारमधीलच काम करेल आणि बिहारचं नाव उज्ज्वल करेल. पुढील काही वर्षांत एक कोटी रोजगारनिर्मितीचं आमचं लक्ष्य आहे आणि त्यासाठीचा सविस्तर आराखडा आम्ही जनतेसमोर मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जगभरात आज ‘मेड इन इंडिया’साठी मोठा उत्साह आहे. आमचं उद्दिष्ट आहे की बिहार ‘मेक इन इंडिया’चं केंद्र बनावे. यासाठी हजारो लघु आणि कुटीर उद्योगांचे जाळे अधिक मजबूत केले जाईल. आमचे सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते. बिहारमधील नवीन एनडीए सरकार या रकमेवर आणखी 3 हजार रुपयांची वाढ करणार आहे. याशिवाय बिहारमधील पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी ‘बिहार दुग्ध मिशन’ या नवीन योजनेचीही घोषणा पंतप्रधानांनी केली.
—————————-
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी
