बंगळुरू, २ नोव्हेंबर (हिं.स.)कर्णधार ऋषभ पंतच्या ९० धावांच्या दमदार खेळी आणि अष्टपैलू तनुश कोटियन आणि अंशुल कंबोज यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे, बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटीत भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा ३ विकेट्सने पराभव केला.
सामन्यात, भारत अ संघाचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या डावात ३०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारत अ संघ २३४ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका अ संघ दुसऱ्या डावात १९९ धावांवर गारद झाला आणि भारत अ संघाला विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य दिले. भारत अ संघाने ७ विकेट्स गमावून २७७ धावा केल्या आणि शानदार विजय नोंदवला.
ऋषभ पंत बाद झाल्यानंतर भारत अ संघाला पराभवाचा धोका निर्माण झाला होता. पण अंशुल कंबोज आणि मानव सुथार यांनी ५० पेक्षा जास्त धावांची नाबाद भागीदारी करून संघाला शानदार विजय मिळवून दिला. अंशुल कंबोजने ४६ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. मानव सुथारने ५६ चेंडूत नाबाद २० धावा केल्या. कर्णधार पंतने ११३ चेंडूत ९० धावा केल्या, ज्यात ११ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. आयुष बदोनीने ३४, रजत पाटीदारने २८ आणि तनुश कोटियनने २३ धावांचे योगदान दिले.
दक्षिण आफ्रिकेकडून तियान व्हॅन वुरेनने तीन, त्शेपो मोरेकीने दोन आणि ओकुहले सेले आणि लुथो सिपामला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिका अ संघाचा पहिला डाव: दक्षिण आफ्रिका अ संघाने त्यांच्या पहिल्या डावात ३०९ धावा केल्या. जॉर्डन हरमनने ७१ धावा, झुबैर हमजाने ६६ धावा आणि रुबिन हरमनने ५४ धावांची अर्धशतक झळकावली. तियान व्हॅन वुरेनने ४६ धावांचे योगदान दिले.
भारताकडून तनुश कोटियनने ४, गुरुनूर ब्रार आणि मानव सुतारने प्रत्येकी २, खलील अहमद आणि अंशुल कंबोजने प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारत अ संघाचा पहिला डाव २३४ धावांवर मर्यादित राहिला. भारत अ संघाने पहिल्या डावात २३४ धावा केल्या होत्या. संघासाठी पहिल्या डावात आयुष म्हात्रेने ६५ धावा, साई सुदर्शनने ३२ धावा, आयुष बदोनीने ३८ धावा आणि रजत पाटीदारने १९ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून प्रेनेलन सुब्रायनने सर्वाधिक पाच बळी घेतले. अशाप्रकारे, पहिल्या डावाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेला ७५ धावांची आघाडी मिळाली.
दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या डावात १९९ धावांवर गारद झाला. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १९९ धावांवर गारद केला. लेसेगो सेनोकवाने (३७) आणि जुबैर हमजा (३७) वगळता इतर कोणताही फलंदाज ३० धावांचा टप्पाही गाठू शकला नाही.
भारताकडून तनुश कोटियनने पुन्हा एकदा सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. अंशुल कंबोजने तीन आणि गुरनूर ब्रारने दोन विकेट्स घेतल्या.
————–
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
