नाशिक, ११ डिसेंबर, (हिं.स.) – मोदी सरकारला एवढा संदेश बस झाला जर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नाही, तर याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. यासाठी तयार रहा, असा इशारा माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिला. केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी संतप्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही, हे दुर्देव आहे. मी कृषीमंत्री असताना कांद्याची किंमत कमी होणार नाही, हे स्पष्ट सांगितले होते. परंतु आताचे सरकार ते करु शकत नाही. यामुळे कांद्याची किंमत वाढताच निर्यात बंदी लागू केली आहे. कांद्याच्या निर्यातबंदीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे. कांद्याची किंमत कमी होणार नाही, हे सरकारने स्पष्ट सांगण्याची गरज होती. जेवणात कांदा आवश्यक गोष्ट आहे. प्रत्येक मसाल्यात कांद्याचा वापर केला जातो. परंतु त्याचे दर वाढताच निर्यात बंदी केली जाते. सरकार शेतकऱ्यांचा काही विचार करणार आहे की नाही.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान अजून दिलेले नाही. हे अनुदान देण्याची प्रक्रिया लवकर राबवा. शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्या, अशी मागणीही पवारांनी केली. तसेच नाशिककरांना शरद जोशी यांच्या आंदोलनाची आठवण करुन दिली. शरद जोशी यांनी नाशिक जिल्ह्यातून शेतकऱ्यांची सामूदायिक शक्ती उभी केली होती. त्यांनी शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवली. तसाच इतिहास आता घडवायचा आहे. नाशिककरांना पुन्हा सामूदायिक शक्ती दाखवावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.
चांदवड तसेच राज्यातील शेतकरी आधीच अवकाळी आणि दुष्काळने कंबरडे मोडले आहे. अश्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कांद्यावर लावण्यात आलेली निर्यातबंदी त्वरित उठवावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मोर्चा काढत मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील आजी माजी आमदार यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला.
हिंदुस्थान समाचार
