नवी दिल्ली, 23 जानेवारी (हिं.स.) : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मंगळवारी मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाला. बिहारच्या जनमानसातील लोकनेते असलेले कर्पूरी ठाकुर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. साधी राहणी, उच्च आदर्शासाठी सर्वज्ञात असलेल्या कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
ठाकूर यांना भारतरत्न मिळणार असल्याची माहिती राष्ट्रपती भवनातून निवेदन जारी करून देण्यात आली. संयुक्त जनतादलाने (जेडीयू) कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर होताच जेडीयूने केंद्र सरकारचे आभार मानले. तसेच कर्पुरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, आम्हाला 36 वर्षांच्या तपश्चर्येचे अखेर फळ मिळाले आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि बिहारच्या 15 कोटी जनतेच्या वतीने सरकारचे आभार मानू इच्छितो असे रामनाथ ठाकूर यांनी सांगितले. मागासवर्गीय समाजाचा विकास आणि सामाजिक न्यायाची कल्पना ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कर्पूरी ठाकूर हे ओळखले जातात. बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकुर हे अतिशय सन्माननीय नाव आहे. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील पितौंझिया या गावा झाला. ते 1952 मध्ये बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि 1988 पर्यंत ते 36 वर्षे बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. या काळात त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असली तरीही कर्पूरी ठाकूर हे सर्वात गरीब नेते म्हणून ओळखले जात होते. कर्पूरी ठाकुर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी तळागाळातील समाजाला शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन सुधारणांना हात घातला. त्यामुळे बड्या जमीनदारांकडून भूमीहिन दलितांकडे जमिनीचे हस्तांतर झाले.
कर्पूरी ठाकुर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भत्त्याशिवाय कोणाकडून एक पैसाही जादा घेतला नाही. आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कर्पूरी ठाकूर यांच्या अनेक कथा आहेत. कर्पूरी ठाकूर 1970 ते 71 या काळात मुख्यमंत्री होते. त्यावेळी कर्पूरी ठाकुर यांच्या मुलीचे लग्न अगदी साधेपणाने झाले. त्यांनी त्या लग्नासाठी कोणत्याही नेत्याला किंवा त्यांच्या मित्रांना आमंत्रित केले नव्हते. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत राहणारे सुरक्षा कर्मचारी आणि जिल्हा प्रशासनातील कुणीही त्या लग्नात उपस्थित नव्हते.
हिंदुस्थान समाचार
