पुणे 23 जानेवारी (हिं.स.) : पुण्यातील एफटीआयआय संस्थेत विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. ”रिमेम्बर बाबरी- डेथ ऑफ कॉन्स्टिट्युशन”अशा आशयाचे बोर्ड या ठिकाणी झळकत आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये खळबळ निर्माण झाल्यानंतर काही संघटनांकडून हे बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यानंतर आक्षेपार्ह बॅनर लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतोय. त्यामुळे एफटीआयआयमध्ये तणापूर्ण शांतता आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये काही कार्यकर्ते बाबरीचे वादग्रस्त पोस्टर फाडताना दिसत आहेत. या कार्यकर्त्यांनी आपल्या हातात बॅनर पकडत झालेल्या प्रकाराचा विरोध दर्शवला. त्याचबरोबर या कार्यकर्त्यांनी ”जय श्रीराम, हरहर महादेव, भारत माता की जय”अशा घोषणाही दिल्या.
घडलेल्या घटनेविषयी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा एफटीआयआयमध्ये दाखल झाला. परिसरातील कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी हा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकाराविषयी चौकशी करुन कारवाई करण्याचे पोलीस उपायुक्तांनी आश्वासन दिले आहे.
हिंदुस्थान समाचार
