नवी दिल्ली , 4 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानसोबतच्या लढाईतून आपण खूप सारे धडे शिकलो, युद्ध एका सीमेवर होत होते पण विरोधक तीन होते, असा खुलासा भारतीय लष्कराचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी केला आहे. ते शुक्रवारी (दि.४)फिक्कीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी चीनवर सुद्धा मोठे भाष्य केले आहे.
ऑपरेशन सिंदूरवरून बोलताना भारतीय लष्कराचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत मला काही धडे लक्षात ठेवावे लागतील. प्रथम, आमच्याकडे एक सीमा होती आणि दोन शत्रू होते, प्रत्यक्षात तीन. पाकिस्तान आघाडीवर होता. चीन त्याला सर्वतोपरी मदत करत होता. चीनने सॅटेलाईट वळविले होते, याच आश्चर्यकारक असे काही नव्हते. कारण गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानने जी जी शस्त्रे वापरली, त्यापैकी ८१ टक्के शस्त्रे चीनची होती.
चीन आपल्या शस्त्रांची चाचणी इतर शस्त्रांबरोबर वापरून घेत आहे. चीन आपल्या या शस्त्रांची चाचणी एखाद्या जिवंत प्रयोगशाळेसारखी करत आहे, असा गौप्यस्फोट देखील सिंह यांनी केला. तसेच ऑपरेशन सिंदूरवेळी भारताविरोधात तुर्कीनेही महत्त्वाची भूमिका बजावली. तुर्की सतत पाकिस्तानसोबत होता, असेही ते म्हणाले.
जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये डीजीएमओ स्तरावरील चर्चा सुरू होती, तेव्हा पाकिस्तानला चीनकडून आमच्या वेक्टरचे लाईव्ह अपडेट्स मिळत होते. भविष्यात अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्हाला एक मजबूत हवाई संरक्षण प्रणालीची आवश्यकता आहे, असे ते यावेळी म्हणाले.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
