सोलापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.) आज कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांच्यासोबत यंदाचे मानाचे वारकरी म्हणून माळेदुमाला गावातील (ता. दिंडोरी, जि. नाशिक) बबन विठोबा घुगे आणि त्यांच्या धर्मपत्नी वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला. घुगे दांपत्य गेल्या 15 वर्षांपासून वारी करत आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात पार पडली. पूजेसाठी फडणवीस दांंपत्य एक दिवस आधीच म्हणजे काल (बुधवारी) पंढरपूरमध्ये दाखल झाले होते.
महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं आहे, तसेच, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी, असं साकडं देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाच्या चरणी घातलेलं आहे.
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी वारकरी दरवर्षीप्रमाणं यंदाही मोठ्या संख्येनं पंढरपूरात दाखल झाले असून, अवघी पंढरी नगरी ज्ञानबा-तुकारामाच्या नामघोषात तल्लीन झाली होती. भाविकांचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही देवाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. यासाठी 5 टन फुले मागविण्यात आली असून रंगीबेरंगी पानाफुलांनी मंदिरामध्ये नेत्रदीपक आरास करण्यात आली होती. पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी ही सजावट केली असून, तब्बल 22 प्रकारची फुलं यासाठी त्यांनी वापरली आहेत. खास लक्ष्मी कमळ फुले देवासाठी बाहेरील राज्यातून मागवली आहे. देवाचं संपूर्ण मंदिर फुलांच्या बगीचा झाल्याचा भासच होत आहे.
हिंदुस्थान समाचार
