भोपाळ, 30 नोव्हेंबर (हिं.स.) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महु येथील जन्मभूमी स्मारकाला साडे सात एकर जमीन मिळाली पाहिजे, अशी येथील जनतेची मागणी असून या मागणीच्या पूर्ततेसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची आपण भेट घेणार आहोत, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आश्वासन दिले.
आंबेडकर यांच्या महु (मध्यप्रदेश) येथील जन्मभूमी स्मारकाला रामदास आठवले यांनी सहकुटूंब भेट दिली. भीमजन्मभूमी स्मारकात महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
भिमजन्मभूमी स्मारकाला दरवर्षी लाखोंची गर्दी येथे वाढत आहे. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ म्हणून येथील स्मारकाला देशभरातुन देश-विदेशातुन लाखो लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या स्मारकाला जागा अपुरी पडत आहे. या स्मारकासाठी अधीक जागेची आवश्यकता असल्यामुळे महु जन्मभूमी लगत असलेल्या जागेपैकी साडेसात एकर जमीन भिम जन्म भूमी स्मारकाला आपण मिळवुन देणार आहोत. त्यासाठी भारत सरकारचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची आपण भेट घेणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. भिमजन्म भूमी स्मारक महु येथे येणा-या अनुयायांना भिमजन्म भुमी स्मारक समिती तर्फे मोफत चहा,पाणी, भोजन, अल्पोहार देण्यात येतो. त्या सेवेला मदत म्हणून आठवले यांनी वैयक्तिक 50 हजार रुपयांची मदत दिली. भीम जन्मभूमी स्मारकाला वार्षिक खर्च म्हणून मध्य प्रदेश राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात 2 कोटींची तरतूद करावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
हिंदुस्थान समाचार
